कल्याण दि.११ जुलै :
एकीकडे धोधो कोसळणारा पाऊस तर त्याचवेळी दुसरीकडे मात्र विठ्ठल नामाच्या सुमधुर वर्षावात तल्लीन झालेले श्रोतेगण. निमित्त होते ते आषाढी एकादशीचे आणि गेल्या ९७ वर्षांपासून शास्त्रीय गायनाचा वारसा अतिशय समृद्धपणे जपलेल्या कल्याणातील नामांकित गायन समाजाच्या वर्धापन दिनाचे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “तिर्थ विठ्ठल एक अभंगवारी” च्या नादब्रह्मात रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले.
समाजातील हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांना गेल्या १४ वर्षांपासून मदतीचा हात देणाऱ्या स्पंदन समाजिक संस्थेच्या मदतीसाठी कल्याण गायन समाजाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात हा सोहळा आयोजित केला होता.
नुपूर गाडगीळ ,कौस्तुभ आपटे आणि महेश कंटे यांच्या बहारदार गायनाला, दीपक घारपुरे(ऑर्गन), जयंत फडके (संवादिनी), स्वप्नील भाटे (तबला), संदीप मयेकर (तालवाद्य), विकास कोकतरे(पखवाज), अविनाश लघाटे (व्हायोलिन) यांनी तितक्याच खुबीने साथ केली. प्रकाशयोजना महेश जोशी तर नेपथ्य राम जोशी यांचे होते. आशिष देवधर यांनी नाट्यदिग्दर्शन आणि निर्मिती सहाय्य अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली.
अतुल वझे आणि मनीषा घारपुरे यांनी तुकाराम आणि आवडाबाई यांच्या भूमिका करून अनोख्या नाट्यरूपाने कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. प्रत्यक्ष पंढरपुरात असल्याचा भास व्हावा इतका सुंदर कार्यक्रम ऐकल्याचे समाधान सर्व श्रोत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
ह्या कार्यक्रमासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते. स्पंदन संस्थेचे प्रमुख प्रशांत दांडेकर यांच्या हस्ते आयुक्तांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयुक्तांनी कल्याण गायन समाजाचा गौरव करताना दरवर्षी गायन समाजाचा वर्धापन दिन महापालिका आणि गायन समाज असा संयुक्त कार्यक्रम करून साजरा करेल अशी घोषणा केली.