Home ठळक बातम्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव हा ऐतिहासिक निर्णय...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव हा ऐतिहासिक निर्णय – माजी आमदार सुभाष भोईर

 

कल्याण दि. २८ जून :

राज्यात एकीकडे राजकीय उलथापालथ सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईत बनणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला मान्यता दिली आहे. भूमिपुत्रांच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना कृती समितीचे पदाधिकारी आणि माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केली आहे. लोकनेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबत सुभाष भोईर यांनी कृती समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकनेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी आपला होकार असल्याचे सांगितल्याची माहिती सुभाष भोईर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नवी मुंबईत बनणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून विविध मार्गाने पाठपुरावा सुरू आहे. गेल्या वर्षी तर नवी मुंबईत विराट मोर्चा काढून भूमिपुत्रांनी या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली होती. त्याला आता वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर कृती समितीने आपल्या मागणीचा पाठपुरावा म्हणून आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेत निवेदन सादर केले. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मागणीला आपला कधीही विरोध नव्हता असे सांगत त्यांचे नाव देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची माहितीही सुभाष भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक निर्णय असून गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या पाठपुरावा याचं हे फलित आहे त्यासोबतच आगरी-कोळी आणि समस्त भूमिपुत्रांसाठी हा दिवस दिवाळी आणि दसऱ्या पेक्षा कमी नसल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच शिवसेनेचा लोकनेते दिबांचे नाव देण्याला विरोध असल्याबाबतचा गैरसमजही उद्धव ठाकरे यांनी आपल्या आजच्या निर्णयातून दूर केल्याचे ते म्हणाले.

तर सध्या राज्यात सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीचा या निर्णयाशी कुठलाही संबंध नसून भूमिपुत्रांनी दाखवलेल्या एकजुटीचा हा विजय असल्याचे सुभाष भोईर यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेला शिवसेना कल्याण ग्रामीणचे प्रकाश म्हात्रे, योगेश म्हात्रे, सुखदेव पाटील यांच्यासह कृती समितीचे विविध पदाधिकरी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा