Home ठळक बातम्या कल्याणातील फुटबॉल कोच लेस्टर पीटर यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

कल्याणातील फुटबॉल कोच लेस्टर पीटर यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव

फुटबॉल क्षेत्रातील योगदानाबद्दल करण्यात आला सन्मान

नवी दिल्ली दि.२२ डिसेंबर :
कल्याणातील युवा फुटबॉल कोच लेस्टर पीटर यांचा नुकताच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कल्याणसारख्या भागामध्ये फुटबॉल क्षेत्रात दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल पीटर यांना नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून फुटबॉल क्षेत्राशी निगडित असलेल्या पीटर यांची सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय फुटबॉल टीममध्येही सर्वात युवा खेळाडू म्हणून स्थान पटकावले होते. मात्र गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे ऐन उमेदीच्या काळातच त्यांच्या स्वप्नाला ब्रेक लागला. काही काळ नैराश्याच्या वातावरणात गेल्यानंतर मात्र पीटर यांच्यातील खरा खेळाडू जागा झाला. आणि आपल्याला खेळता नाही आले, मात्र आपल्यासारख्या गुणवान खेळाडू संधीपासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी नैराश्याला अशी किक मारली की बस्स.

फुटबॉलच्या सोयी सुविधांमध्ये मुंबईसह इतर प्रमूख ठिकाणच्या स्पर्धेत कुठेच नसणाऱ्या कल्याण डोंबिवलीसारख्या ठिकाणी मग पीटर यांनी मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आणि अवघ्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी आतापर्यंत सुमारे दोन हजार शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांना फुटबॉलमध्ये पारंगत केले. ह्यापैकी काही खेळाडूंनी आज जिल्हा स्तरावर तर काही जण राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्ये राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. कल्याणसारख्या ठिकाणी फुटबॉल क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचीच आणि नवे खेळाडू घडवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची पोच पावती म्हणावी लागेल.

तर या सर्व मेहनतीच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला ते केडीएमसी शाळेतील विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांच्या मोफत फुटबॉल प्रशिक्षणाचा घेतलेला निर्णय. तत्कालीन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या पुढाकाराने या महत्वाकांक्षी निर्णयाची मुहूर्त मेढ रोवली गेली. ज्याला आता हळूहळू बहर येऊ लागला आहे. पीटर यांच्या मार्गदर्शनाखाली केडीएमसी शाळेतील मुलं आणि मुलींचे दोन संघ आता जिल्हा आणि राज्यस्तरीय मैदान गाजवायला तयार होत आहेत.

पीटर यांच्या कामाची आताशी कुठे खरी सुरुवात झाली असून अद्याप बराच मोठा पल्ला त्यांना गाठायचा आहे. त्यांच्या या मेहनतीची आणि योगदानाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा