Home ठळक बातम्या ‘तरुणाईच्या उंबरठ्यावरून’ पौंगडावस्थेतील मुलांच्या भावविश्वावर प्रकाशझोत

‘तरुणाईच्या उंबरठ्यावरून’ पौंगडावस्थेतील मुलांच्या भावविश्वावर प्रकाशझोत

 

इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचा उपक्रम

कल्याण दि. ४ जुलै :
पौंगडा अवस्था म्हणजे आयुष्यातील एक असा काळ ज्यामध्ये मुलं लहानही नसतात आणि मोठेही. नेमक्या याच वयात होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक बदलांमुळे मुलांच्या मनात विचारांचे, प्रश्नांचे काहूर माजलेले असते. नेमका हाच धागा पकडून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ तरुणाईच्या उंबरठ्यावर ‘ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवलीतील शाळा – कॉलेजमधील १५ ते १७ वयोगटातील तब्बल ८५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेत नुकत्याच वयात आलेल्या मुलांवर पॉक्सोअंतर्गत कारवाई झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडीयन मेडीकल असोसिएशनने हा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये वयात येताना मुलींमध्ये होणारे शारिरीक – मानसिक बदल, मासिक पाळी, पौंगडावस्थेतील गर्भधारणा, शारीरिक संबंध, त्यातून निर्माण होणारा मानसिक – शारीरिक – कायदेशीर गुंता तर मुलांमध्ये होणारे शारिरीक बदल, स्वप्नदोष, पॉर्न व्हिडिओ, पालकांसोबत बदलणारे नाते आदी नाजूक मात्र महत्वाचे विषय यावेळी अत्यंत हळुवारपणे उलगडून दाखवण्यात आले. डॉ. फेबियन अल्मेडा, डॉ. भूषण पाटील, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. प्रियांका धर्माधिकारी, डॉ. सुरेखा इटकर, डॉ. स्वाती शेलार, डॉ. दिपाली रोठे यांनी वयात येणाऱ्या मुला मुलींच्या मनातील विचार आणि प्रश्नांना वाट मोकळी करून दिली. त्यासोबतच सोशल मीडिया अतीवापराचा पालक आणि मुलं किंवा मुलं आणि त्यांच्या मित्रांच्या नातेसंबधांवर कशाप्रकारे नकारात्मक परिणाम होत आहे याचाही आढावा यावेळी घेण्यात आला.

तर समीर लिमये यांनी या विषयावर आधारित दिग्दर्शित केलेल्या नाटकाच्या माध्यमातून चिराग गरुड, अभिराज कुलकर्णी, तेजस साबळे, प्रतिक्षा देशमुख, आर्या भातखंडे या कलाकारांनी या मुला मुलींची मानसिक अवस्था उत्तमरीत्या सादर केली.

यावेळी बिर्ला महाविद्यालयाचे डॉ. नरेश चंद्रा, के.सी. गांधी शाळेचे अशोक प्रधान, मनोहर पालीवाल, समीर लिमये, मधुरा ओक यांच्यासह आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सचिव डॉ. सुरेखा इटकर, डॉ. ईशा पानसरे उपाध्यक्ष, सहसचिव डॉ.अमित बोटकुंडले, डॉ. अतुल पाटील, डॉ. हिमांशू ठक्कर आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

 

 

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा