Home ठळक बातम्या मणीपुरसारखी परिस्थिती महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न – नाना पटोले यांचा सरकारवर आरोप

मणीपुरसारखी परिस्थिती महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न – नाना पटोले यांचा सरकारवर आरोप

कल्याणात झालेल्या विराट निर्धार मेळाव्यात भाजप – सेनेवर सडकून टीका

कल्याण दि.२१ जून : 

ज्याप्रमाणे आज मणीपूर जातीय दंगलींमध्ये जळत आहे. तशीच परिस्थिती महाराष्ट्रातही करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केला. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या काँग्रेसच्या विराट निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींवर नाव न घेता सडकून टीका केली.

एकापाठोपाठ एक सामाजिक तणाव निर्माण…

गेल्या काही आठवड्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी एकापाठोपाठ एक सामाजिक तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा एकत्रित विचार केला असता, त्या घडवून आणल्या जात असून मणीपूरसारखी अशांतता महाराष्ट्रात पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी यावेळी केला.

म्हणून कर्नाटकात लोकांनी काँग्रेसला मतदान केले…

देशात निर्माण झालेले महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा आदी प्रश्नावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आपल्याला भांडवले जात आहे. कर्नाटकमधील विजयाने लोकांच्या मनात हा विश्वास निर्माण केला आहे की काँग्रेसच महागाई कमी करू शकते, काँग्रेसच गरिबांना न्याय देऊ शकते. त्यामुळेच तर सर्व जाती धर्मातील सर्वाधिक मते काँग्रेसला मिळाल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.

देशामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही…

तर या देशामधील लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवायचे असेल तर देशामध्ये काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाहीये. तर भाजपला देशातील जनतेशी काहीही देणे घेणे नसल्याचेच त्यांच्या निती आणि धोरणांवरून दिसून येत आहे. भारताला जगामध्ये बलशाली बनवण्याचे काम काँग्रेस पक्षाने केलं असून आम्हीच निर्माण केलेल्या मालमत्ता विकून मोदी सरकार देशाला खड्ड्यात घालत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

६ हजार ५०० कोटींचे पुढे काय झाले ?…

तर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर केडीएमसीसाठी ६ हजार ५०० कोटींचे आश्वासन दिले होते. त्याचे पुढे काय झाले? एकही पैसा कल्याण डोंबिवलीत खर्च केला नाही. इथल्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी हा पैसा लुटण्याचेच काम केल्याची टीकाही पटोले यांनी केली.

 नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री – जिल्हाध्यक्ष सचिन पोटे

आज राज्यातील शेतकरी, बेरोजगार, तरुण पिढी असे सर्वच जण नाना पटोले यांच्याकडे आशेने पाहात आहेत. त्यामुळे ते या राज्याचे मुख्यमंत्री पद अतिशय समर्थपणे सांभाळू शकतील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच कल्याण डोंबिवली शहरांच्या मागासलेपणाला भाजप आणि शिवसेना जबाबदार असल्याचे सांगत आपल्या भाषणात त्यांच्यावर जोरदार टीका केली.

यावेळी युवक काँगेस सरचिटणीस ब्रीज दत्त, महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, प्रदेश सदस्य मुन्ना तिवारी यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या निर्धार मेळाव्याला लोकांची तुडूंब गर्दी झाली होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा