Home ठळक बातम्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आदिवासी पाड्यावर रंगली रानभाज्यांची मास्टर शेफ स्पर्धा

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आदिवासी पाड्यावर रंगली रानभाज्यांची मास्टर शेफ स्पर्धा

 

कल्याण दि.16 ऑगस्ट :

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वाघेरे पाडा याठिकाणी रानभाज्या मास्टर शेफ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्याला स्थानिक आदिवासी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकीकडे शहरी भागात जंक फूड आणि फास्ट फुडचे अक्षरशः पेव फुटलेले असताना आदिवासी समाज मात्र आहाराच्या बाबतीत आजही पूर्वजांनी सांगितलेल्या मार्गावर चालताना दिसतोय.

रोजच जगण्यासाठी राना-वनात फिरणाऱ्या या आदिवासी ताईंनी रानभाज्या स्पर्धेसाठी रानातून/ जंगलातून उपलब्ध असलेल्या विविध पौष्टिक भाज्या आणत या रानभाज्या मास्टर शेफ स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी त्यांनी खास केवळ पावसाळ्यात मिळणाऱ्या तेलपाट, लोत, कंटोली, अळूची पाने, देठ, टाकला, कुर्डू, बाफळी अश्या अनेक औषधी आणि पौष्टिक रानभाज्या वेगवेगळ्या पद्धतीने चुलीवर तयार करून आणल्या होत्या. शहरात राहणाऱ्या आपल्यापैकी फारच थोड्या लोकांना या रानभाज्यांची नावे अणि त्यांचे महत्त्व माहिती असेल.

या स्पर्धेत एकूण २५ महिलांनी सहभाग घेतला. तर आदिवासी पाड्यावर झालेली अशा प्रकारची ही पहिलीच मास्टर शेफ स्पर्धा असल्याचे शिक्षिका आशा शिंगाडे आणि अर्चना भोये यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी सरपंच भारती भगत, विनायक मरकडे, रमेश भगत, रवी लचके, रजत पुजारी, महेंद्र भगत, विठ्ठल मांगे यांच्यासह ग्रामस्थ मंडळींनी विशेष मेहनत घेतली होती.

निसर्गाने आपल्याला मुबलक आणि सकस असे अन्न दिलेले आहे. आपण मात्र  त्याकडे साफ दुर्लक्ष करीत जंकफूडकडे वळलो आहोत. हे जंक फूड शरीरासाठी तर  घातक आहेच त्याचसोबत आपल्या मानसिक स्वास्थ्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा