Home ठळक बातम्या विविध प्रश्न- विकासकांमाबाबत मनसे आमदार राजू पाटील आणि केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी...

विविध प्रश्न- विकासकांमाबाबत मनसे आमदार राजू पाटील आणि केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यात बैठक

 

केडीएमसी प्रशासनाला एक महिन्याचा अल्टीमेटम

कल्याण दि. 26 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामे आणि प्रश्नांसंदर्भात मनसे आमदार राजू पाटील आणि केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यामध्ये आज बैठक झाली. सध्या दिवाळीचा सण जवळ आला असल्याने या सर्व प्रश्नांबाबत आम्ही केडीएमसी प्रशासनाला एक महिन्याचा अल्टीमेटम दिल्याचेही आमदार राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या बैठकीत ‘अमृत योजने’ला गती द्या, 27 गावांना पाणी पुरवठा करा, बीएसयुपी प्रकल्प आणि पत्रीपुल विकास योजनेत बाधित रहिवाशांचे पुनर्वसन करा, मोहनसृष्टी फेज-२ च्या बेसमेंटमध्ये असलेल्या पार्किंग आरक्षणानुसार पार्किंग तयार करा, श्रीमलंग रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून जबाबदार अधिकारी- कंत्राटदाराला भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कंत्राटदाराला काळ्या यादीत तर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करा, एमआयडीसी आणि डोंबिवली विभागातील सर्व रस्ते प्राधान्याने दुरुस्त करा, डोंबिवली पूर्व नांदिवली येथील स्वामी समर्थ मठ रस्त्याचे काम करा, आडीवली-ढोकळी रस्ता करा, लोढा पलावा चौक ते निळजे स्टेशन रस्त्याचे सिमांकन, शिळ रस्त्यावरील लोढा हेवन येथील चौकातील अनधिकृत बांधकामे हटवून डीपीप्रमाणे रस्ता तयार करावा, डोंबिवली एमआयडीसीसह लगतच्या २७ गावांमध्ये सुधारीत मालमत्ता कर द्यावा, कल्याण-शिळ रोड ते कासा रिओ मार्गावरील अनधिकृत मार्केट बंद करावे, पलावा चौक डोंबिवली (पू) येथील अनधिकृत बांधकामावर संयुक्त कारवाई करावी, २७ गावातील कर्मचाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कायम करून घ्यावे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातील रिक्त पदे तत्काळ भरणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अपुऱ्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवा, तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या मध्य रेल्वे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांची संख्या वाढत असून दिडशे मीटर अंतरामध्ये फेरीवाले बसवू नयेत आदी विषयांवर मनसे आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांकडे सखोल चर्चा केली.

यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे यावेळी मनसेकडून सांगण्यात आले. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत झालेल्या या बैठकीला मनसे आमदार राजू पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हासंघटक हर्षद पाटील आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा