Home कोरोना शास्त्रीनगर रुग्णालयात लवकरच बालरोग विभागाची निर्मिती; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून पाहणी

शास्त्रीनगर रुग्णालयात लवकरच बालरोग विभागाची निर्मिती; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून पाहणी

 

डोंबिवली दि.26 मे :
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात बालरोग विभाग आणि अतिदक्षता विभाग उभारण्यात येणार आहे. यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार निधीतून रुपये 1 कोटी 25 लाखांचा निधी दिला असून मंगळवारी खासदार डॉ. शिंदे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाची पाहणी केली. तसेच यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्राप्त झालेले 5 व्हेंटिलेटरही रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले.

कोरोनाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये चांगलाच हाहाकार माजवला. तर तज्ञानी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचाही धोका वर्तवला आहे. ज्यामध्ये पहिल्या दोन लाटांमध्ये बचावलेल्या लहान मुलांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकादेखील कोणताही धोका पत्करण्यास तयार नाहीये.

खबरदारीचा उपाय म्हणून डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात लहान मुलांसाठी सुसज्ज असा बालरोग विभाग उभारण्यात येत आहे. याठिकाणी जवळपास 70 खाटा असणार असून त्यातही १० खाटा नवजात अतिदक्षता विभाग (Neonatal Intensive Care Unit-NICU), १० बालरोग अतिदक्षता विभाग (PICU)., १० बालरोग वेंटिलेटर (Pediatric Ventilators) , बालरोग उपकरणे (Pediatric Equipment) , प्राणवायू वाहिन्या (Oxygen Lines) आदी सुविधा असणार आहे. यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 1 कोटी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेले 5 व्हेंटिलेटरही खासदार शिंदे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाच्या स्वाधीन केले.

यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा