Home ठळक बातम्या केडीएमसीच्या लेटलतिफ अधिकारी – कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई

केडीएमसीच्या लेटलतिफ अधिकारी – कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई

 

उशिरा आलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना बजावल्या नोटीसा

कल्याण दि. 10 ऑक्टोबर :
कामावर उशिराने येणाऱ्या केडीएमसीच्या लेटलतिफ अधिकारी – कर्मचाऱ्यांवर आज प्रशासनाने कारवाई केल्याचे दिसून आले. उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये काही उपायुक्त आणि अभियंत्यांचाही समावेश आहे.

कोवीडच्या प्रादुर्भावामुळे साधारणपणे दोन वर्षांपूर्वी शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांना सक्तीची असणारी बायो मेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे. तर कोवीड काळातही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती. परंतू आता कोवीडचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला असून शासनाकडूनही बरेचसे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय कार्यालयांचे कामकाजही आता पूर्वपदावर येऊ लागले आहे.

मात्र असे असूनही केडीएमसीतील काही अधिकारी आणि कर्मचारी अद्यापही शासकीय कार्यालयीन वेळेचे पालन करत नसल्याच्या तक्रारी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यांची दखल घेत आयुक्त डॉ. दांगडे यांनी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांना लेटलतिफ अधिकारी – कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानूसार अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे हे स्वतः आज सकाळी केडीएमसी मुख्यालयात दाखल झाले. आणि उशिरा येणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.

तसेच केडीएमसी अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात येण्याच्या वेळेबाबत, दुपारी जेवण झाल्यावर बाहेर जाण्याबाबत आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज उशिरा आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही त्यांच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही तर मात्र त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही मंगेश चितळे यांनी यावेळी दिला.

त्यामुळे केडीएमसीच्या या कारवाईचा कसा परिणाम होतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा