Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा; जागेच्या आरक्षणाचा तांत्रिक मुद्दा...

कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा; जागेच्या आरक्षणाचा तांत्रिक मुद्दा अखेर निकाली

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने प्रभाग ‘ड’मध्ये जागेच्या आरक्षणाचा तांत्रिक मुद्दा अखेर निकाली

कल्याण दि.3 नोव्हेंबर :
कल्याण पूर्व भागात ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे अशी मागणी होती. या स्मारकासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ५ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. मात्र या जागेवर प्रभाग समितीचे आरक्षण असल्याने स्मारक उभारणीत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. ही बाब ओळखून तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी पुढाकार घेत या जागेवरील १३०० चौरस मीटर क्षेत्राचे आरक्षण क्रमांक ४२३ हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका’साठी बदलण्यात आले आहे. त्यामुळे येथे डॉ. आंबेडकर स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला मिळालेली ही अनोखी भेट असल्याच्या भावना आंबेडकरी अनुयायांनी व्यक्त केली आहे.

कल्याण पूर्व भागात आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी आहे. या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक भव्य स्मारक असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र स्मारकासाठी अपेक्षित असलेली जागा (एकूण ८ हजार १०० चौरस मीटर आरक्षण क्रमांक ४२३) ही प्रभाग कार्यालयाच्या उभारणीसाठी आरक्षित होती. त्यामुळे या जागेच्या आरक्षण बदलासाठी अभ्यासपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे होते. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करून आरक्षण बदलासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचवेळी समांतर पद्धतीने स्मारकासाठी निधी मिळविण्यासाठीही प्रयत्न सुरू होते. या स्मारकाच्या कामासाठी नगरविकास विभागाकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र आरक्षण बदलाच्या प्रतीक्षेत त्याचे काम काहीसे रखडले होते.

मात्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यात सातत्यपूर्ण पाठपुरावा करत 3 नोव्हेंबर रोजी दीपावलीच्या पूर्वसंध्येला नगर विकास विभागाने मौजे तिसगाव येथील ड प्रभाग कार्यालयात शेजारील एकूण ८ हजार १०० चौरस मीटर जागेपैकी १ हजार ३०० चौरस मीटर जागेचे आरक्षण बदलण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. नव्या आरक्षणानुसार १ हजार ३०० चौरस मीटरचे आरक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी असणार आहे. या आरक्षण बदलामुळे गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा रखडलेला हा प्रश्न निकाली निघाला आहे.

स्मारकाची उभारणी लवरकच केली जाणार – डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

दिवाळीच्या पूर्वसंध्येला आंबेडकरी अनुयायांसाठी ही अनोखी भेट डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच आरक्षण बदलाच्या तांत्रिक अडचणीवर विक्रमी वेळेत प्रक्रिया झाली आहे. स्मारकासाठीचा आराखडा यापूर्वीच तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्मारकाची उभारणी लवरकच केली जाणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा