Home ठळक बातम्या बनावट पावत्या देत वीज ग्राहकांची दिड लाखांची फसवणूक; भामट्याला अटक

बनावट पावत्या देत वीज ग्राहकांची दिड लाखांची फसवणूक; भामट्याला अटक

 

कल्याण दि.१५ मार्च :
एकीकडे थकबाकीदारांविरोधात महावितरणने वीजतोडणी मोहीम जोरात सुरू केली असतानाच उल्हासनगरमधील काही थकबाकीदारांना मात्र एका भामट्याने चांगलाच शॉक दिला आहे. वीजबिल भरण्यासाठी दिलेली रक्कम हडप करत या ग्राहकांना महावितरणच्या बनावट पावत्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या भामट्याने 7 वीजग्राहकांना थोडा थोडका नव्हे तर तब्बल दिड लाखांचा झणझणीत शॉक दिला आहे. (Fraud of Rs 1.5 lakh for electricity consumers by giving fake receipts)

दीपक महादेवप्रसाद श्रीवास्तव (उल्हासनगर कॅम्प-३) असे या भामट्याचे नाव असून त्याने आतापर्यंत ग्राहकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. उल्हासनगर येथील साईबाबा मंदिर परिसरात वसुली मोहिमेवर असलेले वित्त-लेखा विभागाचे उपव्यवस्थापक किशोरकुमार जयकर आणि त्यांच्या पथकाला एका थकबाकीदार ग्राहकाने वीजबिल भरल्याची पावती दिली. त्यावेळी महावितरणच्या पथकाला ही पावती बनावट असल्याचे आढळून आले. त्यांनी संबंधित ग्राहकाला त्याबाबत माहिती देत त्या ग्राहकाचा वीजपुरवठाही खंडित केला. त्यानंतर आणखी काही जणांनी अशा प्रकारच्या तक्रारी महावितरणकडे केल्या. या ग्राहकांचा विश्वास संपादन करून वीजबिलाचा भरणा करण्यासाठी दिपक श्रीवास्तवने दिड लाख रुपये घेतले. जयकर यांच्या फिर्यादीवरून उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात श्रीवास्तवविरोधात गुन्ह्याची नोंद झाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासातून फसवणूक झालेले आणखी काही ग्राहक निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून किंवा महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रातच करण्यासह छापील भरणा पावती घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा