Home कोरोना कल्याण-डोंबिवलीत हॉटेल्स-बारला दिलेल्या वाढीव वेळेबाबत दुकानदार आणि व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी

कल्याण-डोंबिवलीत हॉटेल्स-बारला दिलेल्या वाढीव वेळेबाबत दुकानदार आणि व्यापाऱ्यांची तीव्र नाराजी

(प्रातिनिधिक फोटो)

कल्याण / डोंबिवली दि.11 मार्च :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर आजपासून कल्याण डोंबिवलीत महापालिका प्रशासनातर्फे (kdmc covid restrictions) कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र त्यातही हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारला दिलेल्या वाढीव वेळेबाबत दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी (Shopkeepers and traders in Kalyan-Dombivali are angry over the extended time given to hotels and bars) व्यक्त केली आहे. तसेच सर्वांना समान नियम लागू करण्यासह जाचक नियमात बदल करण्याची आग्रही मागणी केली आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये काल 5 महिन्यांच्या मोठ्या गॅपनंतर कोरोना रुग्णांनी 392 चा आकडा गाठल्याने महापालिका प्रशासनासमोर नविन आव्हान उभे केले. त्यावर केडीएमसी आयुक्तांनी तातडीने महापालिका आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि खासगी डॉक्टरांच्या संस्थांची बैठक घेत कल्याण डोंबिवलीत आजपासून निर्बंध लागू केले. ज्यामध्ये खाद्यपदार्थ हातगाड्यांपासून ते लग्न समारंभांपर्यंतचा समावेश आहे. अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने 7 वाजेपर्यंत तर हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बार 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध (hotels-restaurants-bar) त्यात घालण्यात आले होते. मात्र हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बार सुरू ठेवण्याच्या वेळेबाबत केडीएमसी प्रशासनाने अचानक घुमजाव करत ते रात्री 9 ऐवजी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली. त्यामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी शहरातील दुकानदार आणि व्यापारी वर्गाने मात्र याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

आमची दुकाने संध्याकाळी 7 वाजता बंद करणार आणि मग हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारला 11 वाजेपर्यंत परवानगी का? कोरोना केवळ आमच्या दुकानातूनच पसरतो का? रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारमधून पसरणार नाही का? असा संतप्त सवाल या दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनाला विचारला आहे. तसेच नियम आणि कायदे सर्वांसाठी समान करण्यासह केडीएमसी प्रशासनाने हा निर्णय न बदलण्याची मागणी या दुकानदार-व्यापारी वर्गाने केली आहे. व्यापारी आणि दुकानदारांचा केडीएमसी प्रशासनाबाबत निर्माण झालेला रोष शमवण्यासाठी आता महापालिका प्रशासन काय निर्णय घेते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

काय म्हणतात व्यापारी आणि दुकानदार…?

कोवीडविरोधात आम्ही केडीएमसी प्रशासनाच्या सोबत आहोत. मात्र केडीएमसी प्रशासनाने हा निर्णय घेण्यापूर्वी व्यापारी आणि दुकानदारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणे आवश्यक होते. तसेच केडीएमसीने राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे सर्वांसाठी एकसारखे नियम बनवण्याची गरज आहे. – राकेश मुथा

 गेल्यावर्षी बसलेल्या आर्थिक फटक्यातून आताशी कुठे सावरण्यास सुरुवात झाली होती. त्यात आता पी1 पी2 च्या या नव्या निर्बंधांमूळे पुन्हा आम्हाला फटका बसणार आहे. आम्ही सर्व व्यापारी केडीएमसीसोबत आहोत. मात्र त्यांनीही निर्बंध लावताना दुजाभाव करू नये, तसेच पी 1 आणि पी2 बाबत निर्णयाचा फेरविचार करावा.   – विनायक ठाकरे

मागील लेखजंगी विवाह सोहळ्याद्वारे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 264 रुग्ण 168 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा