Home ठळक बातम्या पावसाळ्यात साचणाऱ्या पाणी समस्येविरोधात डोंबिवलीत नागरिकांचे ठिय्या आंदोलन

पावसाळ्यात साचणाऱ्या पाणी समस्येविरोधात डोंबिवलीत नागरिकांचे ठिय्या आंदोलन

 

पालिका प्रशासनाने प्रश्न न सोडवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा

डोंबिवली दि.29 जुलै :
पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांना कंटाळून डोंबिवली पूर्वेच्या नांदीवली भागातील रहिवाशांनी केडीएमसी प्रशासनाविरोधात आज ठिय्या आंदोलन केले. यामध्ये अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाला डोंबिवली शहर मनसेने पाठिंबा दिला आहे.

डोंबिवली पूर्वेतील नांदीवली भागात यंदा पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिली. याठिकाणी असा कोणताही एक परिसर नव्हता ज्याठिकाणी पाणी साचले नव्हते. स्वामी समर्थ मठ परिसरातील रस्त्यावर तर गुडघाभर पाणी साचलेले होते. परिणामी इथला वीज पुरवठाही खंडीत झाल्याने याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात पाण्याची समस्या निर्माण होत असून पालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्यात काही सुधारणा झाली नसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. याठिकाणी असणारी अपुऱ्या गटारांची समस्या, अनधिकृत बांधकामांना आळा न घातल्याने रोखला गेलेला पाण्याचा मार्ग, इमारतींच्या आवारापेक्षा रस्त्यांची वाढत गेलेली उंची आदी कारणांमुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या वर्षागणिक वाढत चालल्याचेही स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

तर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सर्वोदय पार्क ते नांदीवली नाला येथे दोन्ही बाजुंनी गटारे बांधणे, तुंबलेल्या गटारांची साफसफाई करणे, ज्या नविन बांधकामानी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधलेली नाही त्यांच्यावर कारवाई करणे, खड्ड्यांमुळे चाळण झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करणे, सखल भागात लावण्यात आलेले डीपी महावितरणने त्वरित उंच करावेत आदी महत्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

तर येत्या 15 दिवसांत या समस्या सोडवण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास रहिवाशांच्या जनक्षोभास सामोरे जावे लागण्याचा इशाराही यावेळी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्याकडून देण्यात आला आहे.

मागील लेखवाढदिवसाचा खर्च टाळून पुरग्रस्तांसाठी 5 लाखांची मदत; डोंबिवलीतील दांम्पत्याचा पुढाकार
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 63 रुग्ण तर 47 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा