पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने वाचवला जीव
कल्याण दि.9 सप्टेंबर :
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यातच नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने कल्याणच्या वालधुनी पुलाखाली अडकलेल्या तरुणाची पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने थरारकरित्या सुटका केली.
कल्याणच्या शहाड परिसरात राहणारा अर्शद शेख काल संध्याकाळच्या सुमारास वालधुनी नदीवर असलेल्या पुलाखाली गेला होता. पुलाच्या खांबाजवळ उभा असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस थांबण्याची वाट पाहण्याच्या नादात जोरदार पावसामुळे अचानकपणे काही मिनिटातच नदीचा प्रवाह प्रचंड वाढला. आणि अर्शद जीव मुठीत धरून पुलाच्या खांबाजवळ अडकून पडला. पण पाऊस आणि नदीतील पाण्याचा रुद्रावतार पाहून जीव वाचवण्यासाठी त्याने आरडा ओरडा सुरू केला. ज्यामुळे पुलावरून जाणाऱ्या काही लोकांचे त्याच्याकडे लक्ष गेले.
या नागरिकांनी लगेचच नजीकच्या महात्मा फुले पोलिसांना माहिती दिली. महात्मा फुले पोलीस तातडीने पुलाजवळ दाखल होत त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाला त्याची माहिती कळवली. अग्निशमन दलाचे कर्मचारीही काही वेळात शहाड पुलावर दाखल झाले. आणि त्यांनी अथक प्रयत्न करत शिडीच्या सहाय्याने अर्शद शेखला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे पोलिसांसह सर्वांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान हा तरुण पुलाखाली नेमकं कोणत्या कारणासाठी उतरला याची माहिती मात्र समजू शकली नाही.