Home ठळक बातम्या काम लिमिटेड करताय, मग पगारही लिमिटेड घ्या – शहर अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंत्याला...

काम लिमिटेड करताय, मग पगारही लिमिटेड घ्या – शहर अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंत्याला झापले

कल्याण डोंबिवलीत खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

डोंबिवली दि. १८ ऑक्टोबर :
ठेकेदाराकडून व्यवस्थित काम करून घेणे ही तुमची जबाबदारी आहे. जर तुम्हाला लिमिटेड काम करायचे असेल तर मग पगारही लिमिटेड घ्या अशा शब्दांत केडीएमसीच्या शहर अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंत्याची कान उघाडणी केली. दिवाळीच्या पार्श्वभमीवर कल्याण डोंबिवलीत रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. त्याची नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन आहिरे यांनी आज पाहणी केली. त्यावेळी एका कनिष्ठ अभियंत्याशी दूरध्वनीवर रस्त्याच्या कामाबाबत बोलताना त्यांनी ही कान उघाडणी केल्याचे दिसून आले.

लांबलेल्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांचे साम्राज्य…
यंदाचा पावसाळा कल्याण डोंबिवलीकरांसाठी भलताच तापदायक ठरत आहे. दहीहंडी उत्सवापासून मागे लागलेले खड्ड्यांचे हे दृष्टचक्र आता दिवाळी तोंडावर आली तरीही संपण्याचे नाव घेत नाहीये. नाही म्हणायला गणेशोत्सव, नवरात्रौत्सवापूर्वी आणि त्यानंतरही पालिकेकडून खड्डे भरण्याचे काम करण्यात आले. परंतु लांबलेल्या पावसामुळे केडीएमसी प्रशासन आणि नागरिकांचा हा आनंद फार काही टिकू शकला नाही.

सलग तीन दिवस २४ तास खड्डे भरण्याचे काम…
तर अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर केडीएमसी प्रशासनाने पुन्हा एकदा हे खड्डे भरण्यासाठी जोरदार कंबर कसलेली दिसत आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवलीतील एकाच वेळी अनेक प्रमूख रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. पुढील तीन दिवस सलगपणे आणि तेही दिवस रात्र २४ तास हे काम सुरू राहणार असल्याची माहिती केडीएमसीचे नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. तसेच आता सुरू असणारे आणि यापूर्वी करण्यात आलेले काम हे चांगल्या दर्जाचे असून पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे सचिव आणि माहिती जनसंपर्क विभागाचे उप आयुक्त संजय जाधव यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा