Home ठळक बातम्या डोंबिवलीपाठोपाठ आता कल्याणातही निघणार स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा

डोंबिवलीपाठोपाठ आता कल्याणातही निघणार स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा

शिवसेना भाजपच्या वतीने ६ एप्रिलला आयोजन

कल्याण दि.४ एप्रिल :
डोंबिवली पाठोपाठ आता कल्याणातही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष घुमणार आहे. येत्या ६ एप्रिलला शिवसेना भाजपतर्फे कल्याण पश्चिमेला स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार आणि भाजप नेते नरेंद्र पवार हेदेखील उपस्थित होते.

काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. आणि या विधानाचे तीव्र पडसाद उमटत असून राहूल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव करण्यासाठी शिवसेना भाजपतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. डोंबिवलीमध्येही नुकतेच या सावरकर गौरवयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

याच पार्श्वभूमीवर आता कल्याण पश्चिमेलाही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथून या गौरव यात्रेला संध्याकाळी ६ वाजता प्रारंभ होणार असून ती बिर्ला कॉलेज रोडमार्गे मिलिंद नगर आणि मग गौरीपाडा तलाव परिसरात तिचा समारोप होणार आहे. या गौरव यात्रेत शिवसेना भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकही सहभागी होणार आहेत. या गौरवयात्रेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सोसलेले हाल अपेष्टा आणि
स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये केलेले त्यांचे कार्य चित्ररथांच्या माध्यमातून सादर केले जाणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

तर आपण शिवसेना सोडून राहूल गांधींसोबत जाऊ…
जन्मठेपेच्या शिक्षेदरम्यान अंदमानातील कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रचंड हाल सोसले. त्यांचा विचार करता काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी एक दिवस घाण्याला जुंपून काम करून दाखवावे. राहूल गांधी यांनी असे केल्यास आपण शिवसेना सोडून त्यांच्यासोबत जाऊ असे जाहीर आव्हानही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा