Home ठळक बातम्या शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून दोन्ही गट पुन्हा आमने सामने

शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून दोन्ही गट पुन्हा आमने सामने

शाखा कायदेशीरदृष्ट्या ताब्यात घेतल्याचा शिंदे गटाचा दावा तर याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची ठाकरे गटाची प्रतिक्रिया 

डोंबिवली दि. २७ ऑक्टोबर :
शिवसेनेच्या डोंबिवली येथील मध्यवर्ती शाखेच्या ताब्यवरून आज पुन्हा एकदा दोन्ही गट आमने सामने आलेले पाहायला मिळाले. काही महिन्यापूर्वीही या शाखेवरुन वादंग झाला होता. मात्र या कायदेशीरदृष्ट्या ताबा आमच्याकडे आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून देण्यात आली आहे. तर याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाने दिली आहे.

शाखा आता कायदेशीरदृष्ट्या आमच्या ताब्यात – शिंदे गटाची माहिती…
या शाखेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या कामासोबतच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही काम आम्ही करत आहोत. या जागेच्या मालकाशी आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही शाखा आता कायदेशीरदृष्ट्या आमच्या ताब्यात घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते राजेश मोरे यांनी दिली. काही हितचिंतक ही आमची शाखा असल्याचे सांगत होते. त्यामुळे आम्ही कायदेशीर बाबी पूर्ण करून आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडे त्याचा अधिकृत ताबा घेतल्याची माहितीही यावेळी मोरे यांनी दिली. तसेच ही शाखा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची असून इकडे येण्यास कोणालाही आडकाठी केली जाणार नसल्याचेही मोरे यांनी स्पष्ट केले.

याप्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागणार… उद्धव ठाकरे गटाची प्रतिक्रिया…

याबाबत उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते विवेक खामकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच त्यांच्याकडून ही जागा विकत घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या शाखेवर गेली ३२ वर्ष शिवसेनेचा ताबा आहे, आमच्याजवळही कागदपत्रे असून आम्ही दोन दिवसात ती सादर करू. तसेच न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचेही विवेक खामकर यांनी सांगितलं.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा