कल्याण दि.३ एप्रिल :
कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कार्यरत कंत्राटी तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्यानिमित्त गोड गिफ्ट मिळाले आहे. गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित असणारा त्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात कार्यरत ६ कंत्राटी तांत्रिक कर्मचारी गेल्या ७ वर्षांपासून आपल्या वेतनवाढ आणि नोकरीत कायम करण्याक्या प्रश्नांने चिंतेत होते. त्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी अनेक नामांकित व्यक्ती तसेच सुप्रसिध्द रंगकर्मी शरद पोंक्षे यांनीही त्यासाठी आपल्या स्तरावर प्रयत्न केले. परंतु त्यानंतरही या कर्मचऱ्यांप्रश्नी अपेक्षित यश मिळत नव्हते.
आपला प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणून या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी इंडीयन मेडीकल असोसिशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांची भेट घेत त्यांना आपली व्यथा सांगितली. त्यानंतर डॉ. प्रशांत पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांची भेट घेत पुन्हा एकदा या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यावर केडीएमसी आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी तांत्रिक आणि कायदेशीर बाबीमूळे नोकरीत कायम करण्याचा मुद्दा सोडवणे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत सकारात्मक प्रतिसाद देत त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार विद्युत विभागासोबत झालेल्या चर्चेमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीवर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.
यामुळे गेल्या ७ वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न सुटल्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, डॉ. प्रशांत पाटील आणि विद्युत विभागाचे अभियंता प्रशांत भागवत यांचे मनापासून आभार मानले आहेत.