Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतही उष्णतेचा कहर ; 41.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

कल्याण डोंबिवलीतही उष्णतेचा कहर ; 41.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद

 

भिवंडी आणि ठाण्यामध्ये 41.8 तापमानाची नोंद

कल्याण डोंबिवली दि.15 मार्च :
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कल्याण डोंबिवली उष्णतेच्या लाटेचा चांगलाच परिणाम पाहायला मिळाला. हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांच्या नोंदीनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये आज तब्बल 41.4 अंश सेल्सियस इतके उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले. तर ठाणे जिल्ह्यात आज ठाणे आणि भिवंडी या दोन ठिकाणी सर्वाधिक म्हणजेच तब्बल 41.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

मुंबई, ठाणेसह कोकण विभागात आजपासून पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. परिणामी ठाणे जिल्ह्यातील बहुतांश प्रमूख शहरांचे तापमान आज चांगलेच वाढलेले दिसून आले. उत्तरेतून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे ही उष्णतेची लाट आल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सोमवारी एलएनएनशी बोलताना दिली होती. तसेच गुजरात आणि राजस्थानवर तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्यामुळे आणि समुद्र किनारी असणाऱ्या शहरांमध्ये कमी झालेली हवेतील आर्द्रता ही देखील तापमान वाढीचे कारण असल्याचे मोडक यांनी काल सांगितले आहे.

तर हवामान खात्याने दिलेल्या या इशाऱ्यानुसार ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये आज तापमान वाढ ही चांगलीच दिसून आली. एरव्ही दुपारच्या कडक उन्हात बसणाऱ्या हवेच्या झळा 12 वाजण्यापूर्वीच जाणवत होत्या. तर 12 नंतर ते दुपारी 3 साडेतीन पर्यंत तर कडक उन्हामुळे अक्षरशः चटके बसत होते. परिणामी गर्मीपासून बचाव करण्यासाठी सरबत, ताक आणि उसाच्या रसाच्या गाड्या-दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. पुढील काही दिवस ही उष्णतेची लाट राहणार असल्याने लोकांनी त्यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या वर्षी 27 मार्च 2021 रोजी तब्बल 42.5 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली होती अशी माहितीही मोडक यांनी दिली आहे.

एमएमआर रिजनमध्ये नोंदवण्यात आलेलं आजचे तापमान (हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांच्या सौजन्याने)

कल्याण- डोंबिवली – 41.4
ठाणे – 41.8
भिवंडी – 41.8
उल्हासनगर – 41.1
मुंब्रा – 41.1
बदलापूर – 41.3
नवी मुंबई – 40.3

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा