Home ठळक बातम्या केडीएमसी अर्थसंकल्प : लाईफस्टाईलचा दर्जा उंचावण्यासह वस्तुनिष्ठ विकासकामांचे प्रतिबिंब

केडीएमसी अर्थसंकल्प : लाईफस्टाईलचा दर्जा उंचावण्यासह वस्तुनिष्ठ विकासकामांचे प्रतिबिंब

 

शहर सौंदर्यीकरण, आरोग्य, क्रिडा, स्वछता आणि ई – गव्हर्नन्सवर अधिक भर

कल्याण – डोंबिवली दि.4 मार्च :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे 2021 – 22 या आर्थिक वर्षाचे सुधारित आणि 2022-23 या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज सादर केला. करांमध्ये कोणतीही वाढ नसणारा, कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासह शहर सौंदर्यीकरण, आरोग्य, क्रिडा, स्वछता आणि ई – गव्हर्नन्स यासारख्या अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांना अर्थसंकल्पात मिळालेले मानाचे स्थान हे या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकाळात सादर केलेला हा तिसरा अर्थसंकल्प आहे. त्यांच्या कारकिर्दीतील गेली 2 वर्षे ही कोवीडशी लढण्यातच गेली. मात्र त्यानंतरही गेल्या वर्षभराच्या काळात त्यांनी महापालिकेचे उत्पन्नही वाढवले आणि कल्याण डोंबिवलीतील विविध अपुऱ्या विकासकामांना गती देत पूर्णत्वाला नेले.

तर कल्याण हे ऐतिहासिक शहर असून राज्याच्या आर्थिक राजधानीचे प्रवेशद्वार असून डोंबिवली हे बौध्दिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. या पार्श्वभूमीवर इथल्या विकासकामांवर अधिक भर देण्यासह शहरातील सामान्य नागरिकांना याच शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गोरगरीब विद्यार्थ्यांचे क्रीडागुण विकसित व्हावे, शहर स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि मूलभूत सुविधांवर आपण अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच येत्या काळात महापालिका आणि नागरिकांच्या सहभागाच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा निर्माण करत राहण्यासाठी उत्तम दर्जाचे शहर बनवण्याचा आपला प्रयत्न केल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या इतिहासात सादर झालेल्या आजपर्यंतच्या अर्थसंकल्पापैकी सर्वोत्तम अर्थसंकल्प असे आजच्या अर्थसंकल्पाचे वर्णन अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र त्यात तरतूद केलेल्या किती गोष्टी प्रत्यक्षात उतरतात यावर त्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

यावेळी बजेट सादर करताना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली, सचिव संजय जाधव यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आजच्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्य…

कचोरे येथे नविन प्रशासकीय इमारत बांधणे.

खंबाळपाडा येथे अत्याधुनिक नविन क्रिडा संकुल,

इनडोअर कबड्डी स्टेडियम आणि बारावे येथे फुटबॉल स्टेडियमची निर्मिती

वै. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रिडा संकुलाचा कायापालट

50 कबड्डी स्टेडियम, 3 फुटबॉल, 5 क्रिकेट, 25 व्हॉलीबॉल आणि 10 खो खो मैदाने विकसित करणार

खेळाच्या मैदानावर राजकीय, लग्न समारंभ आयोजित न करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार

माय सिटी फिट सिटी बनवण्याचा निर्धार

आंबिवली मोहिली भागातील रस्ते कामे हाती घेणार

डोंबिवली पश्चिम मोठगाव ठाकुर्ली आणि टिटवाळा लेव्हल क्रॉसिंग येथे उड्डाणपूल,

कोपर रेल्वे उड्डाणपुलाला समांतर पूल प्रस्तावित

6 नविन स्मशानभूमी उभारणार

प्राण्यांकरता स्वतंत्र स्मशानभूमीची निर्मिती

मे 2022 पर्यंत सर्व स्ट्रीट लाईटचे एलईडीमध्ये परिवर्तन करणार

नविन इमारतींवर विकासकाकडून 1 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट

येत्या वर्षात वृक्ष गणना करणार

मोक्याच्या ठिकाणच्या भिंती आकर्षक चित्रांनी रंगवणार

उंच इमारतींसाठी 70 मीटर उंच हायड्रोलिक प्लॅटफॉर्म अग्निशमन वाहन खरेदी

80 फायरमन आणि 40 चालकाना ठोकपगारी पध्दतीने घेण्याचे प्रस्तावित

उंबर्डे, निळजे आणि गौरीपाडा तलावांचा विकास करणार

10 नविन उद्यानांसह बायो डायव्हर्सिटी पार्क, दिव्यांगांसाठी उद्यान, ट्रॅफिक पार्क उभारणार

खाडी किनारी पक्षी निरीक्षण मनोरे उभारणार

नेहरू तारांगणच्या धर्तीवर तारांगण उभारणी

आदिवासी वस्ती विकास

नविन प्रसूती गृहे, स्पेशालिटी रुग्णालय, सामान्य रुग्णालय, आयसीयु, एनआयसीयु आणि पीआयसीयूची निर्मिती

कल्याणात डोंबिवलीप्रमाणे एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब

अल्प दरात कॅथलॅब आणि रेडिओथेरपी युनिट पीपीपी तत्वावर

68 हेल्थ वेलनेस सेंटर, 10 पॉलीक्लिनिक,

कल्याण डोंबिवलीत थॅलेसेमिया सेंटरची उभारणी

7 नविन आरोग्य केंद्र सूरू होणार

कल्याण डोंबिवलीत 3 ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करणार

शहर स्वच्छता :

कचऱ्याचे वर्गीकरण, वेस्ट टू एनर्जी, बायोगॅस टू सीएनजी प्रकल्प

कायापालट अभियान

सीबीएसई बोर्डाच्या 3 शाळा सुरू करणार

इलेक्ट्रिक बसेस आणि 62 ठिकाणी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग पॉइंट,

मुख्य रस्त्यावर एअर प्युरीफायर उभारणे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा