Home ठळक बातम्या नविन घर अधिकृत आहे की अनधिकृत समजण्यासाठी केडीएमसीने सुरू केली हेल्पलाईन

नविन घर अधिकृत आहे की अनधिकृत समजण्यासाठी केडीएमसीने सुरू केली हेल्पलाईन

कल्याण/डोंबिवली दि.29 जानेवारी :
काय नविन घर घेताय? पण तुम्ही घेत असणारे नविन घर अधिकृत आहे की अनधिकृत? याबाबत लोकांची फसवणूक टळण्यासह अनधिकृत बांधकामांना आळा बसण्यासाठी केडीएमसीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत हे सांगण्यासाठी केडीएमसीने टोल फ्री हेल्पलाईन सुरू केल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवली जर्नलिस्ट असोसिएशनबरोबर झालेल्या वार्तालापात डॉ. सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली.

कल्याण डोंबिवली आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तसा नविन नाही. गेल्या काही वर्षांत कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकामामध्ये झपाट्याने वाढ झाली असून हा प्रश्न केडीएमसी प्रशासनाच्या हाताबाहेर गेलाय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका आपल्या स्तरावर अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच असल्याची आकडेवारी देत असली तरी प्रत्यक्षात अनधिकृत बांधकामांची संख्या आणि पालिकेची कारवाई तोकडी पडत असल्याचे दिसत आहे. तर लाखो रुपये खर्चून घरं घेणाऱ्या आणि फसवणूक झालेल्या लोकांच्या मनामध्ये पालिकेच्या कारवाईच्या भितीची टांगती तलवार कायम असते. आयुष्यभराची कमाई घर घेण्यासाठी वापरण्यात आल्याने कारवाईच्या भितीपोटी होणारा मानसिक त्रास म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी लोकांची अवस्था होते.
मात्र लोकांचे खर्च होणारे लाखो रुपयांची फसवणूक आणि हा मानसिक त्रास वाचवण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एखादी इमारत अधिकृत आहे की अनधिकृत याची माहिती केवळ एका कॉलवर समजणार आहे. यासाठी केडीएमसीने 18002337295 या टोल फ्री क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. यावर आपण एखाद्या इमारतीची माहिती विचारल्यास ठराविक वेळेत ती संबंधित व्यक्तीला उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात लोकांची आर्थिक फसवणूक, मानसिक त्रास आणि कारवाईची टांगती तलवार या तिन्ही त्रासातून निश्चितच सुटका होणार आहे.

6 कॉमेंट्स

 1. चांगला निर्णय म्हणजे या पुढे शहराचा चांगल्या प्रकारे विकास तरी होईल आणि चांगल्या नागरिक सुरक्षा तरी मिळतील.अनधिकृत बांधकाम वर निर्णय योग्य.

 2. फारच चांगला उपक्रम….पण याच बरोबर तारीख सांगितल्यानुसार जागेचा ताबा न देणार्‍या बिल्डर विरुद्ध कारवाई करावी त्यासाठी काही पर्याय आहे का..डोंबिवली पश्चिम येथे बिल्डर श्री.पवन चौधरी आणि मोरे हे ही गेल्या 4 वर्षा पासुन अनंत तारा बिल्डिंग बनवत आहे आणि जागा घेतलेल्या कडून पैसे घेवुन बिल्डिंग पूर्ण करीत नाहीत.

  • चांगला निर्णय आहे परंतु ज्यांनी अधिकृत घर घेतले आहे आणि इतर सोपस्कार ठरवलेल्या वेळेत बिल्डर पुर्ण करत नसेल तर त्याचे ईतर प्रोजेक्ट थांबवले पाहिजेत उदा. सोसायटी हॅन्ड ओव्हर तसेच कॉन्व्हेंस त्याच प्रमाणे जमीन मालक आणि विकासक यांच्या मधील व्यवहार अग्रीमेंट रजिस्टर नसेल तर परवानगी देऊ नये

 3. पण अनधिकृत बांधकामे काही 1दिवसात पूर्ण होत नाहीत आणि त्या भागातील नगरसेवक आणि पालिकेच्या वारड अधिकारी हेही पूर्ण पणे सामिल असतात , त्यांच्या आशिर्वाद ने तर हे सगळं चालू असत , 1 म्हण आहे Rome was not built-in a day तसाच काही प्रकार आहे

 4. १. टोल फ्री नंबर ची वेळ काय आहे ?
  २. टोल फ्री नंबर वर कशा प्रकारे माहिती विचारली पाहिजे?
  ३. टोल फ्री नंबर वर माहिती लगेच मिळेल का ?
  याचा खुलासा झाला तर बरे !!!

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा