Home ठळक बातम्या ‘राजकारण बाजूला ठेवूया आणि मृत्युकारण तपासूया’ – मनसे आमदारांची पालकमंत्र्यांना भावनिक साद

‘राजकारण बाजूला ठेवूया आणि मृत्युकारण तपासूया’ – मनसे आमदारांची पालकमंत्र्यांना भावनिक साद

केडीएमसी आयुक्त हटवण्याचीही केली मागणी

डोंबिवली दि.११ मे :
पाण्याच्या टंचाईमुळे डोंबिवलीजवळील संदप गावात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ‘राजकारण बाजूला ठेवूया आणि मृत्युकारण तपासूया’ अशी भावनिक साद घातली आहे. तसेच या घटनेप्रकरणी आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यावर आसूड ओढत त्यांना तातडीने हटवण्याची मागणी केली आहे.

गेल्या शनिवारी संध्यकाळी संदप गावाजवळ असणाऱ्या खदानीमध्ये बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा बळी गेला. त्या पार्श्वभमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री शिंदे यांना पत्र लिहून २७ गावातील पाणी समस्या, पाणी मिळण्यासठी करावी लागणारी धडपड आणि त्यावर केडीएमसी आयुक्त यांची भूमिका यावर परखडपणे भाष्य केले आहे.

आमदार राजू पाटील यांनी काय म्हटले आहे या पत्रात…

देसले पाडय़ात पाणी येत नाही. कपडे धुण्यासाठी गेलेल्या गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू झाला. सध्या तुम्ही वाहिन्यांवर दिसता पण चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने. तुम्हाला कदाचित ही घटना माहिती नसेल म्हणून हा पत्र प्रपंच करीत असल्याचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे. पाण्यासाठी वणवण, तहानेने कासावीस होणे हे सगळं एव्हाना सवयीचे होऊन गेलंय. पण आता पुढची पायरी गाठली गेली हो. पाण्यामुळे मृत्यू झालाय एक दोघांचा नाही तर ५ निष्पाप जीवांचा. तुम्ही पालकमंत्री आहात, पाण्यापायी जीव गेला हे ऐकून तुमचे डोळे नक्कीच पाणावले असतील. आता त्याच डोळ्य़ातून वास्तवाकडे पहा असेही आमदार पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

तर या सगळ्याला जबाबदार कोण? पाणी द्या – पाणी द्या असे सांगून ही २७ गावे गेली अनेक वर्षे उर बडवत आहेत. पण तुम्ही ज्यांना आयुक्त म्हणून नेमलेय त्यांच्या कानाशी तो आवाज पोहचतच नाहीये. वारंवार वृत्तपत्रातून आणि माध्यमातून ‘पाणीबाणी’ जाहीर होत असते, पण बहुतेक आपण नेमलेले (की निर्ढावलेले) आयुक्त त्या बातम्यांना केराची टोपलीच दाखवत असल्याचे सांगत आमच्या नागरीकांच्या डोळ्यात पाणी आणायचं आणि तेच पाणी पिऊन जगा असं सांगायचं.तहान भागवण्यासाठी आयुक्तांनी केलेली योजना तर नाही ना असा उद्विग्न सवाल आमदार पाटील यांनी उपस्थित केला आहे.

आता तर रडून भेकून डोळेही कोरडे पडले. आता काय ? अजून काही मृत्यू व्हायची वाट पाहायची का ? म्हणजे आणखी डोळ्यातून पाणी येईल हो, पण नळाला येणार नाही. आमच्या जीवावर उठलेला असा आयुक्त आम्हाला नको शिंदे साहेब, आमच्या पाणी टंचाई विरोधातला आक्रोश पाहून ज्याच्या काळजाला पाझर फुटेल असा आयुक्त हवाय असे सांगत आयुक्त हटवून आमचा जीव वाचवण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघातील रस्ते, पाणी, वाहतूककोंडी, कचरा आणि इतर समस्या आपल्याकडे मांडण्यासाठी आपण अनेकवेळा आपल्यासोबत संबंधीत अधिकाऱ्यांना घेऊन बैठक लावावी यासाठी विनंती केली आहे. परंतु यात कोणते राजकारण आडवे येते हे मला समजत नाही आणि जर तसे काही असेल तर राजकारण बाजूला ठेवूया आणि ‘मृत्यूकारण’ तपासून पाहूया अशी भावनिक साद मनसे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना घातली आहे.

तर बघू-पाहू-करू हे न करता ताबडतोब कृतीची अपेक्षा आहे. ताबडतोब बैठक घ्या, ताबडतोब निर्णय घ्या, आणि ताबडतोब न्याय द्या. लाथ माराल तिथे पाणी काढणारे तुम्ही, कुठे आणि कशी लाथ मारायची ते तुम्हाला नक्कीच माहिती असणार असे शेवटी नमूद करत बैठकीच्या निरोपाची वाट पाहत असल्याचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे.

मागील लेखमहापालिका निवडणूकीसंदर्भात राज्य निवडणुक आयोगाचे महत्त्वाचे आदेश
पुढील लेखकल्याणात भंगाराच्या गाड्यांना आग : ६ कार जळून खाक

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा