क्लस्टरवरून शिवसेनेसह आपल्याच सरकारलाही घेरण्याचा प्रयत्न
कल्याण दि.20 ऑक्टोबर :
“महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी किती हजार कोटी दिलेत हे सांगण्यापेक्षा किती कोटी लोकं मेलेत याचा लेखाजोखा मांडा” या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. तर क्लस्टर योजनेवरून त्यांनी राज्य सरकारमधील मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनाही धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे एवढे हजार कोटी रस्त्यांसाठी दिल्याचे सांगतात. मात्र महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची अवस्था पाहता आणि त्यामुळे कित्येकांचे बळी गेले त्याचे काय? असा सवाल प्रमोद हिंदुराव यांनी गडकरींवर टिका केली. तर ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांची अक्षम्य दुरावस्था तात्काळ सुधारण्यासह मुरबाड रेल्वेचे भूमिपूजन होऊन 3 वर्षे झाली मात्र त्यानंतरही पुढे काहीच झाले नसल्याचे हिंदुराव यावेळी म्हणाले. त्याचजोडीला रेल्वेने प्रवास करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न, बेरोजगारी आदी विषयांवरूनही केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
‘क्लस्टरवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न’…
ठाणे जिल्ह्यापर्यंत क्लस्टर आले असून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कुलगाव बदलापूर, भिवंडीमध्येही ही योजना लागू झाली पाहिजे, जेणेकरून सामान्य माणसाला परवडणारी घरं मिळू शकतील असे सांगत राज्य सरकारला आम्ही त्यासाठी भाग पाडू असेही प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे जिल्ह्यात आपल्याच सरकारचे दोन मंत्री असल्याबाबत त्यांना आठवण करून दिली असता ‘ओरडल्याशिवाय काहीही मिळत नसल्याचे सांगत एकप्रकारे हिंदुराव यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आणि राज्य सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच आमच्याच पक्षाचे सरकार असले तरी वेळ पडल्यास नागरिकांसाठी त्यांच्याविरोधातही लढण्याची तयारी असल्याचे सांगत प्रमोद हिंदुराव यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच आव्हान दिल्याचे यावेळी दिसून आले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 23 ऑक्टोबरपासून ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा आणि 25 ऑक्टोबरला कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर येत असल्याचेही प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी सांगितले.