Home ठळक बातम्या गोवर आजाराबाबत कल्याणातील बालरोग तज्ञांनी दिली ही महत्वाची माहिती

गोवर आजाराबाबत कल्याणातील बालरोग तज्ञांनी दिली ही महत्वाची माहिती

कल्याण दि.३० नोव्हेंबर: 

आपल्या आसपासच्या काही शहरांमध्ये सध्या गोवर आजाराचे मोठ्या प्रमाणावर आढळताना दिसत आहेत. मुंबईमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव जाणवत असून त्यामुळे पालकांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभमीवर कल्याणातील ‘प्रणिषा हेल्थ केअरच्या’ बालरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली पाटील यांनी एलएनएनशी बोलताना ही महत्वाची माहिती दिली.

गोवर आजाराची लक्षणे काय आहेत ?
गोवर झालाय हे ओळखण्याची काही लक्षणे आहेत. उदाहरणार्थ बाळाला ताप येणे, सोबत अंगावर लाल पुरळ उठणे, हे पुरळ येण्याची सुरुवात कानामागून गालावरून सुरुवात होऊन नंतर पूर्ण शरिरावर पसरते. तसेच यासोबतच काही वेळा सर्दी, खोकला आणि डोळे लाल होणे ही लक्षणे देखील असू शकतात अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली पाटील यांनी दिली.

अशी लक्षणे आढळल्यास काय काळजी घ्यायची?
पालकांना आपल्या मुलांमध्ये जेव्हा अशी काही लक्षणे आढळून येतात तेव्हा त्यांनी घाबरून न जाता नजीकच्या शासकीय केंद्रांमध्ये किंवा बालरोग तज्ञाकडून आपल्या बाळाची तपासणी करून घ्यावी. या डॉक्टरांकडून ही केस संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नोंद केली जाते. त्यानंतर हा आजार गोवरच आहे याची ओळख पटविण्यासाठी बाळाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्या तपासणीत हा आजार गोवरच याचे निदान होणे गरजेचे आहे. तर अंगावर पुरळ उठणे आणि ताप आला म्हणजे तो गोवरच आहे असे नसून डेंग्यू सदृश्य आजार, व्हायरल ताप किंवा ही एखाद्या औषधाची ॲलर्जीही असू शकते. मात्र कोणत्याही परिस्थितीत पालकांनी घाबरून न जाता डॉक्टरांशी संपर्क करणे गरजेचे असल्याचे डॉ. सोनाली पाटील यांनी सांगितले.

किती वयाच्या बालकांना हा आजार होण्याची शक्यता आहे ?

हा आजार कोणत्याही वयाच्या बालकांना होऊ शकतो. साधारणपणे 9 महिन्यानंतर हा आजार होत असल्याने बाळाचे नियमित लसीकरण हे त्याच्या 9 व्या महिन्यापासून सुरू होते. शासनाच्या पहिली लस ही बाळ नऊ महिन्यांचे झाल्यावर दुसरी लस 16 व्या महिन्यात आणि तिसरी लस बाळाच्या साडेचार ते पाच वर्षांपर्यंत असे लसीचे तीन डोस देण्याचे निर्देश शासकीय नियमांमध्ये आहेत. तर 9 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांनाही हा आजार होत असल्याचे सद्यस्थितीवरून दिसत असले तरी 9 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना लगेचच ही लस देण्याची आवश्यकता नाहीये. शासनाने हा आजार महामारी (outbreak) म्हणून घोषित केल्यास सहा महिने ते नऊ महिन्यांच्या बाळांना या लसीचा झिरो डोस दिला जाईल. झिरो डोस म्हणजेच गोवरच्या तीन (9 महिने, 16 महिने आणि साडेचार वर्षे) नियमित लसीकरणात या झिरो डोसची गणना केली जाणार नाही. तसेच शासनाकडून ही महामारी घोषित झाल्यास 9 महिने ते 5 वर्षांची जी मुलं आहेत त्यांनाही एक अधिकचा डोस दिला जाईल जो नियमित लसीकरणामध्ये मोजला जाणार नाही. तसेच *महामारी घोषित झाली नसल्यास* ज्या बालकांचे त्यांच्या वयानुसार नियमित लसीकरण सुरू असेल अशा बाळांना ही लस घेण्याची आवश्यकता नाही. तर एखाद्या बाळाची लस घ्यायची राहिली असेल तर पालकांनी नजीकच्या शासकीय केंद्रांत किंवा बालरोग तज्ञाकडून ही लस घेतलेली बरे राहील असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.

 

या झिरो डोस लसीचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का?…
नाही. या एक्स्ट्रा किंवा झिरो डोसचा कोणताही दुष्परिणाम होण्याची शक्यता नाही. किंवा बाळाला त्याचा काहीही त्रास होणार नसून लहान मुलांमध्ये *इम्यूनिटी विकसित होण्यासाठी* आणि आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यामुळे जेव्हा कधी शासनाकडून हा झिरो डोस घेण्याचे जाहीर केले जाईल तेव्हा तो प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला देणे गरजेचे असल्याचे आग्रही मत बालरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली पाटील यांनी व्यक्त केले.

आपल्या परिसरात गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत का?

नाही, कल्याण परिसरात गोवरचे रुग्ण अद्याप आढळून आलेले नाहीयेत. काही जणांना ताप आणि अंगावर पुरळ उठली असली तरी जोपर्यंत चाचणी अहवालात गोवर आजाराचे निदान होत नाही तोपर्यंत हे गोवरचे रुग्ण आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे बालकांमध्ये अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी घाबरून जाऊ नये तसेच त्याची माहिती शासकीय केंद्राला कळविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामध्ये अजिबात टाळाटाळ करू नका असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.

गोवर आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?…
गोवर होऊ नये यासाठी आपल्याकडे आधीच लस उपलब्ध असून बाळाचे नियमित लसीकरण केल्यास हा आजार आपण टाळू शकतो. सध्या गोवरच्या ज्या केसेस समोर येत आहेत त्यातील बहुतांश बालकांनी गोवरची लसच घेतलेली नाहीये किंवा या लसीचे नियमीत डोस चुकवले आहेत. मृत्यूचे प्रमाणही अशाच बालकांमध्ये अधिक असल्याचे दिसत असून लस घेणे आणि त्याचे सर्व डोस पूर्ण करणे हे सर्वाधिक महत्वाचे आहे. त्यासोबतच स्वच्छता आणि पोषक आहार या दोन्ही गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत. या आहारामध्ये व्हीटामिन ए महत्वाची भूमिका बजावत असून त्यासाठी औषधे किंवा तत्सम भाज्यांमधूनही आपल्याला ते प्राप्त होऊ शकते, ताप असल्यास भरपूर पाणी पिणे आदी साध्या गोष्टीही केल्यास या आजाराला दूर ठेवण्यास मोठी मदत होईल. तर पालकांनी या आजाराकडे किंवा त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यताही डॉ. सोनाली पाटील यांनी अधोरेखित केली.

मागील लेख‘गरिबांच्या पाठीवर मायेची ऊब’ देण्यासाठी हवीय मदत – सामाजिक संस्थेचे आवाहन
पुढील लेखसौरऊर्जेचा वापर करा; केडीएमसी विद्युत विभागाची पथनाट्यातून जनजागृती

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा