Home ठळक बातम्या केडीएमसीच्या विविध शाळांमध्ये उत्साहात साजरा झाला ‘वाचन प्रेरणा दिन ‘

केडीएमसीच्या विविध शाळांमध्ये उत्साहात साजरा झाला ‘वाचन प्रेरणा दिन ‘

 

कल्याण दि.१५ ऑक्टोबर :
आज १५ ऑक्टोबर, देशाचे महान शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. डॉ. कलाम यांचा जन्मदिवस हा देशात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून आज केडीएमसीच्या विविध शाळांमध्ये हा वाचन प्रेरणा दिन अत्यंत उत्साहात संपन्न झालेला पाहायला मिळाला. कल्याण डोंबिवलीतील बहुतांश शाळांनी आज विविध उपक्रम राबवत आपला सक्रीय सहभाग नोंदवला.

चांगले मित्र आणि आपले गुरू कोणी नाही हे ब्रीदवाक्य आपल्याकडील अनेक महान व्यक्तींनी आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध केले आहे. नेमका हाच धागा पकडून कल्याण पश्चिमेच्या गांधी चौकातील शाळा क्रमांक १ मध्ये महापालिका सचिव संजय जाधव, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा झाला. महापालिका सचिव संजय जाधव यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुस्तकं वाचण्याचे फायदे, त्यांचे आयुष्याच्या जडण घडणीतील महत्व यावेळी विषद केले. तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याबाबत विद्यार्थ्यांना माहितीही देत प्रत्येकाने दिवसातून किमान पंधरा मिनिटं वाचन करण्यासाठी प्रोत्साहित केले. यानंतर सचिव संजय जाधव आणि प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांच्याकडून उपस्थित विद्यार्थ्याना विविध विषयांवरील पुस्तकंही देण्यात आली.

केडीएमसीच्या गांधी चौकातील एक नंबर शाळेप्रमाणे डोंबिवली पश्चिमेतील पंडित मदन मोहन मालवीय शाळा क्रमांक ८७/३, डोंबिवली पूर्वेतील आचार्य भिसे गुरुजी शाळा क्रमांक -६२, गणेश पथ येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा, खडेगोळवली येथील गोदाताई परुळेकर शाळा क्रमांक १६ आदी शाळांमध्येही हा वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा