Home क्राइम वॉच फेसबूकद्वारे मैत्री करून लाखोंचा गंडा; महिलेसह साथीदार अखेर पोलिसांच्या बेडीत

फेसबूकद्वारे मैत्री करून लाखोंचा गंडा; महिलेसह साथीदार अखेर पोलिसांच्या बेडीत

 

डोंबिवली, दि.२ जानेवारी : 
फेसबूकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट मंजूर करण्यापूर्वी जरा ही बातमी वाचा. आपल्या डोक्याला झिणझिण्या आल्याशिवाय राहणार नाहीत. फेसबुकद्वारे मैत्री करायची…मग समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायचा…त्यानंतर प्रेमाचे नाटक करून हॉटेलमध्ये जेवणाच्या निमित्ताने बोलवायचे आणि मग गुंगीचे औषध देऊन त्याच्याकडील पैसे घेऊन धूम ठोकणाऱ्या महिलेला तिच्या साठीदारासह मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अशाप्रकारे या महिलेने आतापर्यंत किमान 10 ते 12 जणांना गंडा घातल्याची माहिती डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली.

समृद्धी संतोष खडपकर (29 ,रा. खार मुंबई ) आणि विलेंडर विल्फट डीकॉस्टा ( 34 रा.गोवा) अशी या दोघा ठगांची नावे आहेत. मानपाडा पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 16 महागडे मोबाईल फोन, 6 जिवंत राऊंडसह एक रिव्हॉल्व्हर, 2 घड्याळ आणि 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे 21 लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

21 डिसेंबर 2022 रोजी डोंबिवलीत राहणाऱ्या व्यक्तीला फेसबुकच्या माध्यमातून समृद्धीने खोणी येथील हॉटेलमध्ये बोलवले. हॉटेलमध्ये गप्पा मारण्याच्या बहाण्याने गुंतवून ठेवत नंतर गोड बोलून एका रूममध्ये नेण्यात आले आणि त्याच्या जेवणात गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केले. हीच संधी साधून त्याच्याकडे असणारी रिव्हॉल्व्हर, 3 महागडे मोबाईल फोन, सोन्याच्या 3 चैन, ब्रेसलेट, घड्याळ असा पावणे पाच लाखांचा ऐवज घेवुन तिने धूम ठोकली. काही वेळाने या व्यक्तीला शुद्ध आल्यानंतर संबंधित महिलेने आपल्याला लुटल्याचे पाटील यांच्या लक्षात आले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

विशेष म्हणजे चोरून नेलेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरद्वारे कोणताही गैरप्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सुनील तरमाळे, पोलीस हवालदार सुशांत तांबे, राजेंद्र खिल्लारे, यल्लाप्पा पाटील, दीपक गडगे आदींच्या पथकावर ही कामगिरी सोपवली. या पथकानेही मग या महिलेचा कोणतेही धागेदोरे हाती नसताना फेसबुकच्या माध्यमातून मुंबईच्या खार येथील पत्ता शोधून काढला. या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता ही महिला गोव्यामध्ये असल्याचे समजले. त्यावेळी मानपाडा पोलिसांच्या पथकाने मग गोव्यातील म्हापसा परिसरात सापळा रचून समृद्धी आणि तिच्या साथीदाराला जेरबंद केल्याची माहिती एसीपी कुऱ्हाडे यांनी दिली.

दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे अनेक प्रकार घडले असूनही काही जण वेगवेगळ्या मोहाला बळी पडतात आणि जाळ्यात अडकले जातात. यासाठी नागरिकांनी जागरूकपणे सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन यावेळी एसीपी कुऱ्हाडे यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा