Home ठळक बातम्या शहर सौंदर्यीकरणाचे दृश्य परिणाम येत्या दहा दिवसात दिसणार – शहर अभियंता अर्जुन...

शहर सौंदर्यीकरणाचे दृश्य परिणाम येत्या दहा दिवसात दिसणार – शहर अभियंता अर्जुन अहिरे

कल्याण डोंबिवली दि.19 नोव्हेंबर :

कल्याण डोंबिवलीमध्ये सामाजिक संस्था, अशासकीय संस्था, प्रतिष्ठित नागरिक यांच्या लोकसहभागातून शहर सौंदर्यीकरणाचा उपक्रम राबविण्यात येत असून येत्या दहा दिवसांत त्याचे दृश्य परिणाम दिसू लागतील अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी आज दिली. शहर सौंदर्यीकरण उपक्रमाअंतर्गत कल्याण पश्चिमेच्या शहाड जकात नाका ते मोहने परिसरात आज सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सौंदर्यीकरण उपक्रमाला लोकसहभागाची भक्कम जोड…
कल्याण डोंबिवलीचा चेहरा- मोहरा बदलून या नगरीला स्वच्छ आणि सुंदर शहरांचा दर्जा मिळवण्यासाठी सध्या केडीएमसी प्रशासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमाला आता लोक सहभागाची ही जोड मिळाली असून शहरातील विविध सामाजिक संस्था आणि प्रतिष्ठीत नागरिकांसमवेतच अनेक बांधकाम विकासकांनीही त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.

दुर्गाडी बायपास परिसरात सौंदर्यीकरण सुरू…
शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरण मोहिमे अंतर्गत चौकांचे सुशोभीकरण, दुभाजकांची स्वच्छता व रंगरंगोटी, ट्रॅफिक बेटांचे नूतनीकरण यासोबतच रस्त्याच्या साईडपट्टी साफ करणे, तुटलेले पेव्हर ब्लॉक दुरुस्त करणे, रस्त्यांच्या किनाऱ्यालगतची धूळ साफ करणे अशी कामे केली जाणार असल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन आहिरे यांनी यावेळी दिली. त्यानुसार आता नेहमीच दुर्लक्षित असल्याची ओरड होणारा दुर्गाडी बायपास परिसरात स्वच्छता आणि सौंदर्यीकरण सुरू झाले आहे.

नवनविन संकल्पना असल्यास नागरिकांनी पुढे यावे…
आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरांच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नवनविन संकल्पना असल्यास पुढे येऊन त्याबाबत आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहनही शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी यावेळी केले.

या मोहिमेमध्ये शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्यासह घनकचरा विभागाचे उप आयुक्त अतूल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, सहा.आयुक्त राजेश सावंत, सुहास गुप्ते यांच्यासह बांधकाम विकासक विपूल रूपावत , मोहीत सिरनानी हे देखील उपस्थित होते.

आधारवाडी तलावही सुशोभित होणार..
मोहने येथील स्वच्छता अभियानानंतर शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी आधारवाडी जेल रोड परिसरात असलेल्या तलावाची देखील पाहणी केली. या ठिकाणी महापालिका आणि मोहींदर सिंग काबूल सिंग शाळेच्या एनएसएस पथकाने सामजिक संस्थेच्या माध्यमातून तलाव आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्याचे दिसून आले. परंतु या तलाव परिसरात स्वच्छता करूनही वारंवार निर्माल्य आणि प्लास्टिक पिशव्यांसह इतर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी येत्या काळात या तलाव सुशोभीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा