Home ठळक बातम्या अतिवृष्टीचा इशारा : एनडीआरएफची तुकडी कल्याण डोंबिवलीत दाखल

अतिवृष्टीचा इशारा : एनडीआरएफची तुकडी कल्याण डोंबिवलीत दाखल

 

कल्याण – डोंबिवली दि.10 जून :
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज कल्याण डोंबिवलीत एनडीआरएफची (नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फोर्स) एक तुकडी दाखल झाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत या तुकडीने कल्याण डोंबिवलीतील अतिधोकादायक इमारतींसह दुर्घटना होऊ शकतील असे विविध ठिकाणांची पाहणी केली. (Warning of heavy rains: NDRF team arrives at Kalyan Dombivali)

पुढील काही दिवस कोकणातील चारही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून बुधवारी त्याची चांगलीच झलक पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस आणखी धोक्याचे असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची 18 जणांची ही तुकडी कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका प्रशासनाच्या मदतीला दाखल झाली आहे. आज या तुकडीने कल्याण डोंबिवलीतील अति धोकादायक इमारतींची पाहणी केली. तसेच यावेळी नेतीवली परिसरात असणाऱ्या टेकडीचाही दौरा करत भूस्खलन (landslide) होऊ शकते का याचा अंदाज घेतला.

तर कल्याण डोंबिवलीमध्ये 162 अतिधोकादायक इमारती असून त्यापैकी 30 इमारती अगोदरच पाडण्यात आल्या आहेत. तर इतर इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांचे संक्रमण शिबीरात स्थलांतर केले जात आहे. दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर त्याठिकाणी कशाप्रकारे बचाव आणि मदत कार्य राबवता येईल।याचा अंदाज घेण्यासाठी ही पाहणी करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तसेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेल्या तारखेपर्यंत ही तुकडी इकडे थांबणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी, उपायुक्त पल्लवी भागवत हे देखील उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा