Home कोरोना कल्याणातील ‘हजारे बंधूंनी’ केलं ‘लाखमोलाचे काम; ‘प्लाझ्मादाना’तून दिला सामाजिक संदेश

कल्याणातील ‘हजारे बंधूंनी’ केलं ‘लाखमोलाचे काम; ‘प्लाझ्मादाना’तून दिला सामाजिक संदेश

केतन बेटावदकर

कल्याण दि.5 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीत एकीकडे दररोज कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असताना कोवीड रुग्णांना मोठ्या प्रमाणात ‘प्लाझ्मा’ची आवश्यकता भासत आहे. अशावेळी कल्याणातील राहुल हजारे, ऍड. जयदीप हजारे आणि केतन हजारे या तिघा हजारे बंधूंनी ‘लाखमोला’चे काम करत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.

कल्याण डोंबिवलीत दररोज कोरोना रुग्णांचा आकडा नवनविन उच्चांक प्रस्थापित करत आहेत. गेल्या महिन्याभरात तब्बल 15 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची आपल्याकडे भर पडली आहे. एकीकडे या आकडेवारीने अनेकांच्या उरात धडकी भरली असताना अनेक कोवीड रुग्णांना ‘प्लाझ्मा’ची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत आहे. मात्र वाढत्या कोरोना रुग्णांमुळे एकीकडे रक्तदान कमी होऊ लागल्याने ब्लडबँकामधील रक्तसाठाही झपाट्याने कमी झाला आहे. अशात प्लाझ्मा मिळणे तर आणखीच जिकिरीचे बनले आहे. नेमकी हीच उणीव भरून काढण्यासह समाजातील इतर लोकांनीही प्लाझ्मादान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी कल्याणातील हे हजारे बंधू पुढे सरसावले आहेत. त्यांच्यातील ऍड. जयदीप हजारे यांनी गेल्या वर्षी राबवलेल्या प्लाझ्मादानाच्या चळवळीमूळे अनेक कोवीड रुग्णांचा जीव वाचण्यासाठी मोठी मदत झाली आहे.

यावेळी गेल्या महिन्याभरातच कोवीड रुग्णांनी मोठा आकडा ओलांडला असून प्लाझ्माची गरजही तितकीच वाढत आहे. त्यामूळे आम्ही तिघा भावंडांनी एकत्रितपणे हा प्लाझ्मादानाचा निर्णय घेतल्याची माहिती ऍड. जयदीप हजारे यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

कल्याणातील हजारे कुटुंबियांनी घेतलेला हा पुढाकार आताच्या घडीला अत्यंत सुत्य असून इतरांनीही त्याचे अनुकरण करण्याची खरी गरज आहे. विशेषतः आपल्याकडील राजकीय मंडळींनी तर मोठ्या प्रमाणात असा उपक्रम राबविल्यास ‘प्लाझ्मा’ची कमतरता भरून निघण्यासह कोणाचा जीव वाचण्यासही मोठी मदत होईल. ऍड. जयदीप हजारे, राहुल हजारे आणि केतन हजारे या तिघाही भावंडांच्या या सामाजिक कार्याला ‘एलएनएन’चा सलाम.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा